हैदराबादचा ४४ धावांनी विजय   

हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने जबरदस्त सुरुवात केली. हैदराबादच्या संघाने राजस्तान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव करत जबरदस्त विजय साकारला. या सामन्यात राजस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकांत २८६ धावा केल्या. यावेळी ६ फलंदाज बाद झाले. हैदराबादच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर हेड याने ६७ धावा केल्या आणि शानदार अर्धशतक केले. त्याच्याबरोबर आलेला अभिषेक शर्मा याने २४ धावा केल्या आणि तो झटपट बाद झाला. इशान किशन याने त्यानंतर शानदार शतक साकारले. 
 
इशान किशन याचे या वर्षीच्या आयपीएलमधील पहिले शतक ठरले. त्याने यावेळी ११ चौकार आणि ६ षटकार मारले. आयपीएलच्या स्पर्धेच्या गत हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ३ बळीच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात २८७ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. 
 
राजस्तान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात इशान किशनचे शानदार १०६ (४७)* शतक आणि ट्रॅविस हेडच्या ६७ धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघ नवा विक्रम सेट करण्याच्या अगदी उंबरठ्यावर होता. पण आपलाच  विक्रम मो़डून नवा विक्रम सेट करण्यासाठी अवघ्या दोन धावा कमी पडल्या. या सामन्यातील  ६ बाद २८६ धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. 
 
सर्वाधिक धावसंखेच्या विक्रमाच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावरही सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी संघाचाच नंबर लागतो. गत हंगामात हैदराबादच्या मैदानात त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध ३ बाद २७७ धावा केल्या होत्या. २०२४ च्या हंगामात केकेआरच्या संघानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानात ७ बाद २७२ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आघाडीच्या पाचमध्ये पुन्हा सनरायझर्स हैदराबादचा नंबर लागतो. गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध दिल्लीच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं ७ बाद २६६ धावा केल्या होत्या. ऑरेंज आर्मीचा हा रेकॉर्ड हा संघच ३०० पारचा नारा देण्याची धमक असणारा संघ आहे, असे वाटते.
 
आघाडीच्या ५ सर्वोच्च धावसंख्येशिवाय २५० पेक्षा अधिक धावा करणारे संघ
 
आरसीबी- ५ बाद २६३ धावा विरुद्ध वॉरियर्स, बंगळुरु (२०१३)
पंजाब किंग्ज- २ बाद २६२ धावा विरुद्ध केकेआर, ईडन गार्डन्स (२०२४)
आरसीबी - ७ बाद २६२ धावा विरुद्ध एसआरएच, बंगळुरु (२०२४)
केकेआर- ६ बाद २६१ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, ईडन गार्डन्स (२०२४)
दिल्ली कॅपिटल्स - ४ बाद २५७ धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली (२०२४)
एलएसजी- ५ बाद २५७ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, मोहाली (२०२३)

Related Articles